नाशिक – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक ३१ मार्च २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सहकार विभागाने शुक्रवारी याबाबत अध्यादेश काढला आहे. नाशिकबरोबरच सोलापूर, नागपूर, बुलढाणा या चार जिल्हा बँकाच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहे.
अगोदर कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होता. पण, आता सहकार विभागाने काढलेल्या अध्यादेशात वेगळे कारण दिले आहे. त्यात म्हटले आहे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे बँकेचे व्यवस्थापन गेल्या तीन वर्षापासून अधिक काळ संचालक मंडळाकडे राहिल्याने बँकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. सन २०१७ ते मार्च २०२१ पर्यंत नाशिक बँक ही रिझर्व्ह बँकेव्दारे विहित केलेली ९ टक्के भांडवल पर्याप्तता राखू शकलेली नाही. त्यामुळे बँकेकडून बँकिंग नियमन अधिनियम १९४९ चे कलम ११ मधील तरतुदींचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे बँक परवान्यासाठी आवश्यक अर्हता निकष पूर्ण करु शकत नसल्याने बँकिंग परवाना धोक्यात आले आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करुन बँक पूर्वपदावर नियुक्त केलेले प्रशासक मंडळ आणखी कालावधीसाठी राहणे आवश्यक आहे. या कालावधीत प्रशासक मंडळास थकीत कर्जाची वसुली भांडवल पर्याप्ततेमध्ये सुधारणा, बँकिगं व्यवसायत वाढ, बँकेच्या कामकाजात व्यावसायिक व्यवस्थापन आणणे यासाठी कालावली लागणार असल्याने बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे.