‘इंडिया दर्पण’ मधील नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत पोरखेळ करणाऱ्यांवर कारवाईची गरज हा लेख वाचला. त्यात नमूद केले आहे की, काही सभासद क्रिकेटसाठी वेळ न देता प्रसिध्दीसाठी उमेदवारी करतात. निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर फिरकत नाही, प्रचार देखील करत नाही, अशा सभासदांचे सभासदत्व रद्द करावे, निवडणुकीत उमेदवारी करण्यास बंदी घालावी वेळ पडल्यास उमेदवारास कठोर शिक्षा करावी अशी अपेक्षा देखील व्यक्त करतात. ही झाली एक बाजू पण, दुसरी बाजूही समजून घ्यायला हवी.
गेल्या २००३ सालापासून खेळाडू पॅनलचे धनपाल (विनोद) शाह चेअरमन पदी कार्यरत आहेत. क्रिकेट असोसिएशनची निवडणूक त्रैवार्षिक असते. सातव्यांदा धनपाल शाह हेच चेअरमन पदी विराजमान आहेत. म्हणजे दुसरा कोणीही त्या पॅनल मध्ये चेअरमन पदास पात्र नाही असाच अर्थ निघतो. शाह यांच्या एकाधिकार शाहीमुळे इतर कोणीही सर्व सामान्य उमेदवाराने निवडणुकीत उभे राहू नये का? शाह आपले ऐकतील अशाच मित्रांना पॅनल मध्ये उमेदवारी करण्याची संधी देतात. शाह हेच पासष्ट लाख लोकसंख्या असलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेटचे तारणहार आहेत का? माझा या गोष्टीला विरोध आहे म्हणून मी उमेदवारी केली याचा मला अभिमान आहे.
राहिला प्रश्न क्रिकेट घटनेत बदल करण्याचा तर लोकशाहीत चौथा आधारस्तंभ म्हणून आपण खालील गोष्टीत लक्ष जरूर घाला.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन घटनेत बदल करतांना जून्या घटनेतील चेअरमन, सेक्रेटरी, दोन सहसचिव, खजिनदार व १० कार्यकारिणी सदस्य याऐवजी
१] प्रत्येक तालुक्यातून एक संचालक घ्यावा.
२] महिला खेळाडू मोठ्या प्रमाणात खेळतात त्यामुळे दोन महिला प्रतिनिधी संचालकांना संधी मिळावी.
३] खेळात जातपातीला महत्त्व नाही असे नसेल तर ओबीसी, एस सी/एस टी, एन टी उमेदवारांना प्रतिनिधीत्व द्यावे.
४]निवड समितीत सदस्यांत हस्तक्षेप नसावा.
आणि मग बघा विद्यमान पॅनलच वर्षानुवर्ष निवडून येते का?
यंदाची निवडणूक दोनच सभासद बिनविरोध करू शकत होते धनपाल शाह, महेश भामरे पण दोन्हीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळेच निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य सभासदाने निवडणुकीत उमेदवारी केली म्हणून संस्थेचे नुकसान झाले असे सिध्द झाल्यास कठोर शिक्षा म्हणून सभासदांच्या उपस्थितीत हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर मला फासावर लटकवा.
आपला नम्र
महेश भामरे, नाशिक