नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीचा
पोरखेळ करणाऱ्यांवर कारवाईची गरज
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना (एनडीसीए) सारख्या मातब्बर संस्थेची निवडणूक अतिशय महत्त्वाची असणे स्वाभाविक आहे. लोकशाहीत कुणालाही उभे राहाण्याचा हक्क आहे. हे मान्य करूनही निवडणूक लढविताना आपण क्रिकेटसाठी भरपूर वेळ आणि वेगळे काही देऊ शकतो का याचा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने गांभीर्याने विचार केला पाहिजे. उगाच केवळ प्रसिद्धीसाठी अर्ज भरणे किंवा उमेदवारी कायम ठेवणे योग्य नाही.

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
क्रिकेटसाठी काहीही contribution न देता निवडणूकीचा अर्ज दाखल करायचा. नंतर प्रचारही करायचा नाही, निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर फिरकायचेही नाही, असे करून निवडणुकीचा पोरखेळ करणाऱ्या उमेदवारावर निश्चितच कारवाईची गरज आहे. प्रचार न करायला आणि मतदान केंद्रावर न यायला सबळ कारण नसेल तर त्याचे सदस्यत्व काही वर्षापुरते रद्द करणे, पुढील निवडणुकीत उभे राहण्यासाठी बंदी करणे किंवा उभे रहाणाऱ्या उमेदवारांना मोठे डिपॉझिट भरायला लावणे, आवश्यक तेवढी मते न मिळाली तर डिपॉझिट जप्त करणे यापैकी किंवा आणखी काही कठोर शिक्षा झाली तरच अशा वृत्तीला लगाम बसेल …तसेच फक्त Panel आणि तेही किमान १० उमेदवार असतील तरच उभे राहायला परवानगी दिली पाहिजे. एनडीसीएला स्वतःचे उत्पन्न नाही. अशातच केवळ एका उमेदवारामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागणे, लाखो रुपयांचा खर्च करणे हे कितपत योग्य आहे.
क्रिकेट लोकप्रिय आहे. त्याला ग्लॅमर आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना भक्कम पायावर उभी आहे. हे यश एका दिवसात मिळविलेले नाही. तर अनेकांच्या कष्टाने मिळविलेले आहे. याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. तसे न करता संघटनेच्या लोकप्रियतेतील काही किरणे काहीही कष्ट न घेता आपल्याही अंगावर पडावी अशा सुप्त हेतूने काही जण अर्ज भरतात. या प्रवृत्तीला लगाम बसलाच पाहिजे…
खरे तर संघटनेत काही वर्षे प्रत्यक्ष काम केले तरच उभे रहता येईल अशी अटच घातली पाहिजे…प्रश्न नाशिकचे क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांच्या भवितव्याचा आहे. एनडीसीए ने त्यांच्या घटनेत यासाठी तातडीने बदल करायला हवा. तेव्हाच अशा गैरप्रवृत्तीना लगाम बसेल. अन्यथा विनाकारण लाखोंचा चुराडा होईल आणि पदरी काहीच पडणार नाही.