इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचे केवळ शारीरिक आणि मानसिक नव्हे तर संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते. अलीकडच्या काळात देशभरातील अनेक राज्यांमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांमध्ये खूपच वाढ झाली आहे. विशेषतः पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली, राजस्थान, बिहार आदी सारख्या राज्यांमध्ये या भयानक घटना मोठ्या प्रमाणावर घडल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात देशात कठोर कायदे असूनही बलात्कार करणारे नराधम हे समाजात मोकाटपणे वावरत असतात, त्यामुळे या संदर्भातील कायदे आणखीन कठोर करायला हवेत. अशाच प्रकारची घटना गुरुग्राममध्ये घडली असून एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात शेजाऱ्यावर बलात्काराचा आरोप आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फारुखनगर भागातील एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने वारंवार बलात्कार केला. यादरम्यान ती गरोदर राहिली आणि एके दिवशी तिला पोटात दुखू लागल्याने हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर त्या पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. संशयित आरोपी गौतम हा एका खासगी कंपनीत कामाला असून तो पीडित कुटुंबाच्या शेजारी राहत होता. दरम्यान, याच गावात एका मुलीवर बलात्कार होऊन ती गरोदर राहिली होती. सात महिन्यांनंतर त्याच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळला, तेव्हा महिला पोलिस स्टेशन, वल्लभगड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.