नाशिक – विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी अभिनंदन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनपर भाषण करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षनेने अत्यंत अनुभवी नेते लाभल्याचे सांगितले. तरुणांना हेवा वाटावा असे व्यक्तीमत्व, अजितदादा प्रत्येक प्रश्नांच्या मुळाशी धावतात असेही त्यांनी सांगितले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील, काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदनपर भाषण केले.
विश्वास दर्शक ठराव मतदानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज विधानसभा अध्यक्षांना याबाबतचे पत्र देण्यात आले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागले याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात जयंत पाटील यांचे नावही आघाडीवर होते. पण, राष्ट्रवादीने अजित पवार यांना संधी दिली.