नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी तारखा जाहीर झाल्या आहेत. आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या उमेदवारांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. सर्व विरोधी पक्षांचे एकमत झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एकाच विचारसरणीचे पक्ष एकाच व्यासपीठावर आल्यास पुढील रणनीतीवर चर्चा करता येऊ शकेल, हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा संदेश मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवला आहे.
संजय सिंह यांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. शरद पवार यांचे राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांमध्ये नाव असेल का असा प्रश्न विचारताच, शरद पवार यांनी निवडणूक लढावी अशी आमची इच्छा आहे असे सूतोवाच खासदार सिंह यांनी केले आहे. शरद पवार यांनी याविषयी कोणतीच टिप्पणी केली नाही. शरद पवार यांची सकारात्मक भूमिका असली तरी अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
सोनिया गांधी यांनी स्वतः याविषयी शरद पवार आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली होती. दरम्यान, या विषयावर चर्चा करण्यासाठी तृणमूल काँग्रेसने १५ जून रोजी दिल्लीत २२ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत दिल्ली, केरळ, ओडिशा, तेलंगण, तामिळनाडू, महाराष्ट्र, झारखंड आणि पंजाबचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस, एनसीपी, आरजेडी, सपा, आरएलडी यांच्यासह १० राजकीय पक्षांना आमंत्रित केले आहे.
आमंत्रितांपैकी या बैठकीत नेमके कोण कोण येणार आहेत हे वेळेवरच दिसेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे १५ जूनला पंजाबला जाणार आहेत. विरोधी पक्षांकडे ५,४०,००० मत आहेत. तर एनडीएकडे ४,९०,००० मत आहेत. मात्र विरोधी पक्षात एकजूट राहील की नाही, ही सर्वात मोठी समस्या आहे.