मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या महाराष्ट्रात पत्राचाळ प्रकरण गाजत आहे. कथित पत्रा चाळ प्रकरणात तेव्हा म्हाडा प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता आणि त्यामुळे चौकशीच्या प्रकरणाचे धागेदोरे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यापर्यंत जात आहेत. इतकेच नव्हे तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये गेले, आता त्याच प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली आहे.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर बोट ठेवत भातखळकरांनी शरद पवार यांचीही याप्रकरणामधील सहभागाविषयी चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता भातखळकर आणि भाजपच्या अन्य नेत्यांच्या आरोपाला लगेचच शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘या प्रकरणात आरोप काय आहेत. चौकशी करणारी एजन्सी कोर्टात काय म्हणत आहेत, या दोन्ही गोष्टी तुम्हाला स्पष्ट सांगतील, तसेच पत्राचाळ प्रकरणी चौकशीला आम्ही तयार आहे. लवकरात लवकर चौकशी करा, जर हा आरोप वास्तव आणि सत्याला धरुन नसेल तर आरोप करणाऱ्यांवर काय भूमिका घेणार हेही राज्य सरकारने जाहीर करावे, असेही शरद पवार म्हणाले.
एकीकडे मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या सुमारे १ हजार कोटीं रूपयांपेक्षा जास्त कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. आता भाजपने पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत, पत्राचाळ प्रकरणी त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यावरुन सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे आणखी भाजपने त्यांच्याकडून सुरू होण्या आधीच आज खासदार शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे.
तातडीने पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले. ‘काल माझ्यावर काही आरोप झाले आहेत का, त्या बैठकीत पत्राचाळ प्रकरणी काम देण्यात आले या विधानाला काही आधार आहे का ? असा सवाल पवार यांनी यावेळी केला. याप्रकरणी माझी खुशाल चौकशी करा, इतकेच नव्हे तर आणखी कोणाची चौकशी करायची असेल तेही करण्यास आम्ही तयार आहोत. परंतु त्यात जर आम्ही निर्दोष ठरलो, तर मग सरकार काय करणार ? याचे उत्तर द्यावे असा सवालही पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात माहिती दिली.आव्हाड म्हणाले की, ही बैठक २००६ साली आहे. हा प्रकल्प १९८८ चा आहे. तेव्हापासून प्रकल्प अडकला आहे, यासाठी शरद पवार यांनी बैठक घेतली आहे. याप्रकरणी चौकशी करा पण पराचा कावळा करु नका, असे आव्हाड म्हणाले. तसेच एखाद्या प्रकरणाचा पराचा कावळा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची, सगळे कागदपत्र सरकारला द्या, सरकार निर्णय घेईल. हे सगळ करुन शरद पवार यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही कधीच बेछूट आरोप करत नाही. तुम्ही लगेच या प्रकरणाची चौकशी करा, असेही आव्हाड म्हणाले.
गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी करार केला होता. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी ३ हजाराहून अधिक फ्लॅट तयार करायचे होते. एकूण फ्लॅटपैकी ६७२ फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरुआशिषकडे राहणार होते. दरम्यान, गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केली. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन १०३४ कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.
म्हाडाने गुरुआशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला. नंतर याच प्रकरणी प्रवीण राऊतला आणि सारंग वाधवानला अटक झाली होती. त्यानंतर राऊत यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र असून पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना त्यांचे नावही समोर आले होते. त्यानंतर संजय राऊत यांना अटक झाली असून ते सध्या कोठडीत आहे असा या प्रकरणाचा दिवसेंदिवस एकंदरीत गुंता वाढतच आहे.
NCP Sharad Pawar on Patra Chawl Scam
Politics ED Money Laundering Politics Sanjay Raut Mhada
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD