मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संजय राऊत यांनी विधीमंडळाच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानाशी आपण मुळीच सहमत नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राऊत यांच्या विधानानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर सर्वच पक्षातील सदस्यांनी संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली.
शरद पवार आणि संजय राऊत या जोडीने २०१९ मध्ये भाजपचा गेम केला असे बोलले जाते. या दोघांच्या तासातासाला होणाऱ्या बैठकी आणि त्यातून तयार करण्यात आलेली राजकीय समीकरणं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाली, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. महाराष्ट्रातील अडिच वर्षांची सत्ता महाविकास आघाडीच्या पारड्यात पाडण्याचे संपूर्ण यश या दोघांना दिले जाते. पण त्याचवेळी शरद पवार यांनी संजय राऊतांना हाताशी घेऊन शिवसेनेचा वचपा काढला, असेही राजकीय विश्लेषक म्हणतात.
थोडक्यात काय तर या ही जोडी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडविण्यासाठी ओळखली जाते. मात्र आता संजय राऊत यांच्या विधानावरून शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत विजय खेचल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसाठी मुंबईत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय राऊत यांच्या विधीमंडळावरील विधानाबाबत चर्चा रंगली होती. त्यावेळी शरद पवार यांनी ही नाराजी व्यक्त केली.
समिती न्यायाला धरून नाही
संजय राऊत यांच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचे शरद पवार म्हणाले. पण त्याचवेळी संजय राऊतांच्या विरुद्ध हक्कभंगासाठी जी समिती नेमली आहे, ती न्यायाला धरून नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. ज्यांनी आरोप केले तेच या समितीत असतील, तर न्याय कोण करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी विधीमंडळ सभागृहाचा चोर मंडळ असा उल्लेख केला होता. त्यामुळे चांगलाच गदारोळ झाला. राऊतांच्या या विधानावर संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध नोंदविण्यात आला. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे सभागृहातही यावर गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना धारेवर धरले आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
NCP Sharad Pawar on MP Sanjay Raut Statement