मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार यांच्यासोबत जाऊन खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्षशिस्तीचा भंग केला आहे. परिणामत: या दोघांवरही कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र खासदार तथा कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले. त्यानंतर तत्काळ पवार यांनी तटकरे आणि पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करतानाच दोघांची खासदारकी रद्द करणारे पत्र संसद सचिवालयाला देण्यात आले आहे.
रविवारी भरदुपारी रंगलेल्या शपथविधीने नवीन राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच सुप्रिया सुळे यांनीच पटेल आणि तटकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याचे पत्र पुढे आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,‘राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या संसदेतील दोन खासदारांनी पक्षविरोधी कारवाई करत २ जुलै रोजी झालेल्या शपथविधीला उपस्थिती दाखवली होती. त्यानंतर या दोन्ही खासदारांनी माध्यमांसमोर त्यांची भूमिका मांडत पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे.
या दोन खासदारांनी आणि पक्षाच्या नऊ आमदारांनी पक्षाची कोणतीही संमती न घेता निर्णय घेतला आहे. पक्षाच्या अध्यक्षांना अंधारात ठेवत, त्यांना कोणतीही कल्पना न देता या नेत्यांनी काही गोष्टी केल्या. त्यामुळे ते पक्षातून बडतर्फीस पात्र ठरतात. पक्षाच्या या दोन खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी बाजूला सारल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. तसेच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या मतांना त्यांनी न जुमानता मतदारांचाही विश्वासघात केला आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या १०व्या परिशिष्टानुसार, पक्षांतरबंदी कायद्यांच्या अंतर्गत या नेत्यांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी विनंती.’ खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्रतेची कारवाई करावी, अशीही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. त्यानंतर पवार यांनी तातडीने या दोघांवर कारवाई केली आहे.
या कारवाईमुळे शरद पवार हे अतिशय आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. या धडाकेबाज कारवायांमुळे बंडखोरांचे धाबे दणाणले आहेत. तसेच, पक्षातील फूट टाळण्यातसुद्धा ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.