मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील राजकीय घडामोडींना झपाट्याने वळण लागले. पुतण्या अजित पवार याच्या नेतृत्वात पक्षाच्या अनेक आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांनी बंड केले आहे. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता एकामागोमाग एक निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या ५ जुलै रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यात पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ नेते एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. सत्ताधारी एनडीएला पाठिंबा देत अजित पवार यांना आज राज्याचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले तर राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. २०१९ नंतर त्यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
येत्या बुधवारी दुपारी एक वाजता दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एकनाथ शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा देत नाही. सरकारच्या पाठिंब्याच्या पत्रावर सह्या केलेल्या अनेक आमदारांनी मला फोन केला आहे. आणि सांगितले की, मी संभ्रमात असून शरद पवारांना नेहमीच पाठिंबा देईन, असे सांगितले आहे.
पाटील पुढे म्हणाले की, पक्षातील काही नेत्यांनी अनेकदा मागणी केली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जावे. परंतु पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने ती कधीच मान्य केली नाही. राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी पक्षाच्या आदर्शांच्या विरोधात मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ‘आतापर्यंत आमच्या पक्षाचे (शिंदे सरकारमध्ये) नऊ आमदार मंत्री झाले आहेत. तर काही जण शपथविधी सोहळा पाहण्यासाठी गेले होते. राजभवनाला सादर केलेल्या पत्राचा हवाला देत सूत्रांनी दावा केला की अजित पवार यांना त्यांच्या पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि सहाहून अधिक विधान परिषद आमदारांचा पाठिंबा आहे. पक्षाचे ५३ आमदार आणि ९ विधान परिषद आमदार आहेत.