मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आतापर्यंत पक्ष आणि चिन्हापर्यंत मर्यादित असलेल्या अजित पवारांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरच दावा केला आहे. यासंदर्भात निवडणुक आयोगाला पत्र देण्याची तयारी अजितदादांनी एक आठवड्यापूर्वीच केली होती, अशी धक्कादायक बाब आज उघडकीस आली आहे.
अजित पवार यांनी ४० आमदारांच्या समर्थनाचे पत्र तसेच प्रतिज्ञानपत्र निवडणुक आयोगाकडे आज सादर केले आहे. या पत्रावर ३० जून या तारखेचा उल्लेख आहे. याचाच अर्थ २ जुलैला प्रत्यक्ष बंड पुढे आलेले असले तरीही अजित पवार यांनी कायदेशीर लढाईची तयारी आधीच करून ठेवली होती. रविवारी दुपारी राष्ट्रवादीचे नऊ नेते राजभवनाकडे शपथविधीसाठी निघाले आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. अजित पवार यांनी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानंतर त्यांनी २ जुलैला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ या दिग्गज नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यानंतर खरी लढाई सुरू झाली ती पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी.
अजित पवार यांच्यासह त्यांच्या सर्वच समर्थक नेत्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा ठोकला. शरद पवार यांच्या फोटोचा बॅनवर वापर करत भाषणांमधूनही आपणच खरे राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. जयंत पाटलांची हकालपट्टी करून सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष केले. पण निवडणुक आयोगाकडे प्रत्येक गोष्ट कायद्याच्या दृष्टीने सिद्ध व्हावी, याची तयारी आधीच करून ठेवण्यात आली होती. शपथपत्रही तयार होते. आज निवडणूक आयोगाकडे अजित पवार हेच अध्यक्ष असल्याचा दावा करणारे पत्रही सादर करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आहेत, यासंदर्भात झालेला ठरावही अजित पवार यांनी आयोगाकडे दिला आहे.
शरद पवार यांचा कॅव्हेट
शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच आयोगकडे कॅव्हेट दाखल केला आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय देऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे. चिन्ह, पक्षाचे नाव किंवा इतर कुठल्याही बाबतीत एकतर्फी निर्णय दिला जाऊ नये, असे या कॅव्हेटमध्ये नमूद आहे.
हा तर शिंदे पॅटर्न
अजित पवार यांनी पक्ष फोडणे, त्यांच्यासह काही लोकांनी मंत्रीपदाची शपथ घेणे, समर्थक आमदारांच्या स्वाक्षरीचा ठराव सादर करणे आणि आता पक्षाचे नाव व चिन्हावर दावा करणे… हा संपूर्ण शिंदे पॅटर्न असल्याचे स्पष्ट दिसत आहे.