मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधीमंडळ अधिवेशन उद्या पासून सुरू होत असल्याने राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. यांच्या नेतृत्वातील सर्व मंत्री आणि महत्त्वाचे नेते हे शवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या भेटीत नेमके काय घडले याबाबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटले यांनी माहिती दिली आहे. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते या भेटीत गेले होते.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे मंत्री शरद पवार यांना भेटले. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजित पवार हे अगोदरच सिल्व्हर ओक येथे शरद पवारांना भेटले होते. आता ही त्यांची दुसरी भेट आहे. तर इतर नेत्यांची ही पहिली भेट होती.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड चव्हाण सेंटरमध्ये आले आहेत. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी तातडीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करून यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बोलवून घेतले आहे. त्यानंतर या गटाची बैठक सुरु झाली आहे.
जयंत पाटील म्हणाले
अजित पवार यांचे नेतृत्वातील गटांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्या संदर्भात आता जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की हे सर्वजण पवार साहेबांना भेटण्यासाठी आले होते. ते अनपेक्षितपणे आले. पवार साहेबांनी त्यांचे सर्व म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले आहे. या गटाचे म्हणणे आहे की आपण एकसंध राहू. चूक झाली आहे. आपणच यातून काय तो मार्ग काढावा. पवार साहेबांनी यावर त्यांना कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. यावर आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ असे पाटील म्हणाले