नाशिक – जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने कामाला लागावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली येवला तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या अध्यक्षांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांशी सवांद साधून कार्यकारिणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकारिणीची नव्याने बांधणी करण्यात यावी. पक्षाच्या विविध पदावर जे अकार्यक्षम तसेच निष्क्रिय पदाधिकारी असतील त्यांना त्यांच्या पदावरून हटवून नव्या दमाच्या सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी. जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करत असतांना येणाऱ्या आगामी निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा सक्षम उमेदवार तयार करावा. जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी सर्व सेलच्या कार्यकारिणी व पक्षाच्या कामकाजाचा पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांना आढावा दिला. त्यांनी यावेळी ३० ऑगस्टच्या आत सर्व नवीन कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना सबंधित पदाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, येवला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, महिला अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष यशवंत शिरसाट, विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करे, ओबीसी सेलचे अध्यक्ष समाधान जेजुरकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष अकबर शहा, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.योगेश गोसावी आदी उपस्थित होते.