मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्यामुळे सध्या राज्यातील राजकारण पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटानंतर आता शिंदे गटाकडूनही राज्यपाल हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असेच एक बेताल वक्तव्य केल्याने त्याचाही सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी आपले घटक पक्ष असलेल्या भाजपकडे मागणी केली आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याने त्यांना अन्य राज्यात पाठवावे. गायकवाड यांच्या या मागणी तथा विधानाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे.
खरे म्हणजे सध्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप तथा शिंदे गट यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. याला कारण म्हणजे सुमारे तीन-चार महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकमेकांना समजून घेत सरकार चालवत होते. परंतु शिवसेनेमध्ये उभी फूट पडून सत्तांतर झाले. तेव्हापासून एकीकडे भाजप आणि शिंदे गट तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट असा संघर्ष पेटला आहे. त्यातच विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे विषयी एक अत्यंत वाईट वक्तव्य केल्याने या वादाला आणखीनच तोंड फुटले होते. परंतु आता चक्क सुप्रिया सुळे यांनी वेगळीच भूमिका घेतल्याने असे नेमके काय घडले ? याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत. इतकेच नव्हे तर दाल में कुछ काला है ! असे देखील म्हटले जाते किंबहुना आता या कहाणी मध्ये काहीतरी वेगळाच मोड येणार की काय? असे देखील बोलले जात आहे.
राज्यपालांच्या या विधानावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी इशारा दिला. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान होत असेल तर हे चांगलं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे दोघानांही परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला. त्यावरूनच सुप्रिया सुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक विधानाबाबत आमदार संजयजी गायकवाड यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करुच शकत नाही’, असे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे शिंदे गटातील आमदाराचे अभिनंदन आणि कौतुक केले. त्यामुळे राजकीय विश्लेषक तथा निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
NCP MP Supriya Sule Praises Shinde Group MP
Politics