पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी नाट्य घडत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे नाराज असल्याची बातमी समोर आली होती. या बातमीवर कोल्हेंनीदेखील नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. पण यानंतर आता अमोल कोल्हे यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक यादीतून वगळल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारक यादी जाहीर करण्यात आलीय. पण या स्टार प्रचारकांच्या यादीत अमोल कोल्हे यांचं नावच नाही. त्यामुळे कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचं काही दिवसांपूर्वी शिर्डीत चिंतन शिबिर पार पडलं होतं. या शिबिरात पक्षाध्यक्ष शरद पवार हे आजारी असून देखील हाताला बँडेज बांधून पोहोचले होते. या कार्यक्रमाला अमोल कोल्हे उपस्थित नव्हते. त्यामुळे अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. दुसरीकडे अमोल कोल्हेंनी प्रकृती बरी नसल्याने आपण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नव्हतो. याबाबत आपण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
असे असले तरी अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ‘शिवप्रताप गरुड झेप’ या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी भेट घेतल्याचं स्वत: स्पष्ट केलं होतं. याशिवाय अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प, चाकण येथे होणारा इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.
खासदार अमोल कोल्हे हे उत्तम वक्ते आहेत याचा दाखला देण्याची अजिबात गरज नाही. पक्षाची धुरा इतर राज्यात ते यशस्वीपणे सांभाळू शकतात. त्यामुळे स्टार प्रचारक यादीत त्यांचे नाव असणे क्रमप्राप्त होते. तरीही ते वगळले जाऊन कोल्हे यांना दुर्लक्षित केल्याने तसेच कोल्हे यांची भाजपसोबत वाढणारी जवळीक ही राष्ट्रवादीसाठी मोठी घोडचूक तर ठरणार नाही ना अहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
NCP MP Amol Kolhe Party Decision Politics
Election Star Campaigner