मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवारांच्या नेतृत्वातील गट सरकारमध्ये सहभागी होत नाही तोच तीन वर्षांपूर्वी झालेल्या पहाटेच्या शपथविधीच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठा खुलासा आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अत्यंत योग्य असाच होता.
रविवारपासून राज्यात नवे सत्तानाट्य सुरू झाले आहे. राज्याने कधी अनुभवला नसेल असा प्रकार सध्या सुरू आहे. अजित पवार यांनी सरकारमध्ये येत राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आहे. त्यांच्या या कृत्यानंतर हे तर होणारंच होते, असे म्हणण्यात येत आहे. तर काहींना मात्र हा धक्का अद्याप सहन झालेला नाही. तर काहींनी थेट तीन वर्षांपूर्वीच्या पहाटेच्या शपथविधीचा हा दुसरा भाग असल्याचे सांगत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. या दरम्यान पवारांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या खासदार पटेल यांनी पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादीच्या हिताचाच असल्याचे म्हटले आहे.
तसेच २०२२ ला महाविकास आघाडीची सत्ता जेव्हा जात होती, तेव्हा शिंदे सुरत, गुवाहाटी, गोवा करत फिरत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार, विधानपरिषद सदस्य शरद पवारांना भेटले होते. आपण भाजपासोबत सत्तेत जाऊ अशी विनंती करत होते. अजित पवारांनी पहाटे शपथविधी केला याबाबत वारंवार बोलण्यात येते. परंतु, अजित पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी तो निर्णय घेतला होता, असे पटेल यांनी म्हटले आहे.
शरद पवारांना केले आवाहन
अजूनही वेळ गेलेली नाही. मी जाहीरपणे हात जोडून, पाय जोडून विनंती करतो आमची भावना समजून घ्या. तुमच्या आशिर्वादाने आम्ही सगळे याच दिशेने काम करू, असे भावनिक आवाहन पटेल यांनी शरद पवारांना केले आहे. अजित पवार विरोधी पक्षनेते होते. त्यांना सत्तेत जायची गरज नव्हती. पण, त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आपण त्यांना शेवटपर्यंत साथ देऊ, त्यांचे काही चुकत असेल तर त्यांना सांगू महाराष्ट्राच्या हितामध्ये हे बसणार नाही, असे पटेल म्हणाले.
वैचारिक मतभेदावर कडाडले पटेल
पटेल यांनी वैचारिक मतभेदाच्या मुद्द्यवरून बरीच उदाहरणे देत भाजपसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय योग्य ठरविला आहे ज्या दिवशी महाविकास आघाडी बनली तेव्हा शिवसेना कोणासोबत भाजपासोबत होती. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना सर्वाधिक शिव्या दिल्या बाळासाहेबांनी दिल्या. तरीदेखील ती आघाडी झाली, मग भाजपासोबत गेलो तर काय वाईट झाले. काश्मीरच्या मेहबुबा मुफ्ती, फारुक अब्दुल्ला हे भाजपासोबत जाऊ शकतात. स्टॅलिन एनडीएचे भागीदार होते, असे सांगत पटेल यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचे समर्थन केले आहे. तसेच केंद्र सरकारविरुद्ध तयार होत असलेल्या आघाडीच्या बैठकीची देखील त्यांनी खिल्ली उडविली आहे. ते म्हणाले,‘मी विरोधकांच्या त्या बैठकीला गेलो होतो. ते चित्र जेव्हा मी पाहिले तेव्हा मला हसू येत होते. एका पक्षाचे खासदार शून्य होते. त्या १७ पक्षांसोबत जाऊन काय होणार? त्यापेक्ष आम्ही पक्षाच्या, मतदारसंघांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे.’