मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर आता शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू झाली आहे. याचअंतर्गत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. त्यामुळे अजित पवारांसह बंडखोर आमदारांच्या अडचणी वाढणार आहेत. तसेच, शपथ घेतलेल्या ९ आमदारांव्यतिरीक्त अन्य आमदारांना पक्षाची दारे खुली असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पाटील म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवार यांना आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
येत्या ५ जुलै रोजी शरद पवार यांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच शरद पवारांसोबत असणारा, त्यांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी असेल असे स्पष्ट केले.
आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. ९ आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले. ज्याक्षणी ९ आमदारांनी शपथ घेतली त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
शिस्तभंगाची कारवाई होणार
उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी तर मंत्रिपदाची शपथ श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, श्री. हसन मियालाल मुश्रीफ, श्री. धनंजय पंडितराव मुंडे, श्री. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, श्री. संजय बाबूराव बनसोडे, श्री. अनिल भाईदास पाटील यांनी घेतली आहे. या सर्वांवर पक्षांतर बंदी कायद्यान्वये शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्र पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.