जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीमुळे जिल्ह्याची निवडणूक जवळ आल्याने राजकारण सध्या चांगलंच तापले आहे. गेल्या सात वर्षापासून जळगाव दूध संघ एकनाथ खडसे समर्थकांच्या ताब्यात असल्याने त्यांच्याकडून दूध संघ हिसकावून घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आले असल्याचे सांगण्यात येते. त्यातच एकनाथ खडसेंना पुन्हा एक धक्का बसला आहे. कारण जिल्हा दूध संघात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधातील औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली असून हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता खडसेंचा बालेकिल्ला मुक्ताईनगरात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवण्याचा मार्ग खुला झाला आहे.
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे मुक्ताईनगर तालुक्यात सभासद नसतांना त्यांनी उमेदवारी दाखल केली असून ती उमेदवारी रद्द करावी यासाठी मंदाकिनी खडसे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. मात्र ती औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा दूध संघाच्या संचालकपद निवडणूकीच्या अर्जांची छाननीही करण्यात आली आहे. यात २० संचालक निवडीसाठी मतदान होणार आहे. छाननीत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे जगदीश बढे हे रावेर तालुक्यातून बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या पॅनलची सरशी झाली आहे.
एकनाथ खडसे यांच्या पत्नी व संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी दाखल केली आहे, त्यांच्या विरोधात भाजपचे मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर तालुक्यातूनच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चव्हाण यांच्य अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी हरकत घेतली घेवून औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता, मात्र आमदार चव्हाण हे चाळीसगाव तालूक्यात सभासद आहेत, मात्र त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल केल आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी खंडपीठात सादर केलेल्या याचिकेत केली होती.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर मतदार संघातून यामुळे मंदा खडसे यांच्यासमोर आमदार मंगेश चव्हाण यांचे अतिशय मोठे आव्हान राहणार आहे. त्यातच दूध संघ ताब्यात घेण्यासाठी खडसे आणि गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या दोन्ही नेत्यांच्या मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने खडसे हे सध्या एकटे पडल्याचे दिसत आहे. मात्र सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठी ही निवडणूक कठीण आहे. पुढील महिन्यात दि. १० डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. परंतु आता न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर कोणाचे पारडे जड होते, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच खडसे आणि महाजन संघर्ष आणखीनच तीव्र बनत चालला आहे.
खडसेंची जीभ घसरली
ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर कठोर टीका करताना खडसे यांना सर्व पदे त्यांच्या घरात हवी असतात, असे म्हटले होते. त्यावर खडसे यांनी प्रत्यारोप करताना त्यांची जीभ घसरली. महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिकेच्या अध्यक्ष पदावर कायम का आहेत? साधना महाजन तुमच्या कुटुंबातल्या की बाहेरच्या आहेत? दुर्दैवाने महाजन यांना मुलगा नाही, नाहीतर कदाचित मुलगा राजकारणात आला असता, असे वादग्रस्त विधान खडसे यांनी केले. तसेच खडसे आणखी म्हणाले की, भाजपमध्ये ही मोठी घराणेशाही असून नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे देखील घराणेशाहीमधून आले आहेत. त्यांना हा नियम लागू नाही का? असा टोलाही त्यांनी लगावला.
NCP Leader Eknath Khadse Aurangabad Bench Court Decision
Jalgaon District Milk MLA Mangesh Chavhan