नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि डॉक्टर प्राची पवार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा उलगडा झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास केल्याने त्यांना यश आले आहे. डॉ. पवार यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. डॉ. पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी तिघांनी हा हल्ला करुन बदला घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०७:२० वा. चे सुमारास नाशिक शहरातील सुश्रूत हॉस्पिटलच्या मुख्य संचालक डॉ. प्राची वसंतराव पवार या त्यांचेकडील इनोव्हा कारने गोवर्धन शिवारातील आपल्या घरी पवार फार्मस् येथे जात होत्या. फार्म हाऊसचे गेटवर अज्ञात आरोपींनी मोटरसायकल रस्त्यात आडवी लावली. मोटरसायकल आडवी का लावली? अशी
विचारणा केली असता, सदर आरोपीने रस्त्यातील गाडी न हटविता त्यांचेशी अरेरावीची भाषा वापरून वेळकाढूपणाची भूमिका
घेतली. थोड्याच वेळात शेजारील पिकात लपून बसलेले आणखी २ जण तेथे आले व त्यातील एकाने डॉ. प्राची पवार यांचेशी
हुज्जत घालत त्यांचे हातातील लोखंडी धारदार कोयत्याने डॉ. प्राची पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
डॉ. पवार यांनी आपल्या दोन्ही हातांनी ते अडवल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यावेळी तिस-या आरोपीने लवकर करा, मारून
टाका, सोडू नका असे बोलून तिघेही मोटर सायकलवर बसून तेथून पळून गेले. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि,
नंबर २३३ / २०२२ भादवि कलम ३०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका डॉक्टर महिलेवर एकटे घरी जात असतांना झालेल्या हल्ल्याचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे-केदार, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग श्री. अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग श्रीमती कविता फडतरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थीतीचा सविस्तर आढावा घेतला. सदर गुन्हयातील आरोपींना अटक करण्यासाठी विविध तपास पथकांना मार्गदर्शन करून नाशिक शहर व शहरालगतचे गावांमध्ये पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील व नाशिक तालूका पोलीस
ठाण्याच्या पोनि सारिका आहिरराव यांनी तपास पथकांसह घटनास्थळ परिसर व नाशिक शहरात आरोपींचा शोध सुरू केला.
आरोपी हे गुन्हा केल्यानंतर त्यांचेकडील मोटर सायकलने गंगापूर रोडने नाशिक शहराचे दिशेने भरधाव वेगाने जात असतांना त्यांचे मोटर सायकलला अपघात झाल्याने ते एका ठिकाणी खाली पडले असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. आरोपींनी परिधान केलेले कपडे व वर्णनावरून पोलीस पथकाने नाशिक शहरात आरोपींचा कसोशीने तपास सुरू केला. आरोपींचे वर्णन, तांत्रिक माहितीचे विश्लेषण व प्राप्त गुप्त माहितीचे आधारावर सदर आरोपींनी एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले असल्याचे निदर्शनास आल्यावरून खालील ०३ इसमांना ताब्यात घेण्यात आले. अभिषेक दिपक शिंदे, (वय १९, रा. इंदुमती बंगला, कलानगर, प्रमोद महाजन गार्डनमागे, गंगापूर रोड), धनंजय अजय भवरे (वय १९, रा. काचणे, ता. देवळा, हल्ली मुक्काम अवधुतवाडी, दिंडोरी रोड, म्हसरूळ), आणि पवन रमेश सोनवणे, श्वरय २२, रा. लोहणेर, ता. सटाणा हल्ली मुक्काम सातपुर कॉलनी) असी या तीन आरोपींची नावे आहेत.
सदर संशयितांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्यांनी दिनांक १९/१२/२०२२ रोजी गंगापुर रोड, गोवर्धन शिवारातील पवार हाऊस परिसरात येवून गेटवर थांबून डॉ. प्राची पवार यांचे इनोव्हा कारला मोटर सायकल आडवी लावून गाडी बंद असल्याचा बहाणा केला. तसेच, त्यांच्याशी अरेरावीची भाषा करून, धारदार हत्याराने त्यांचेवर जीवे ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला केला असल्याची कबुली दिली आहे. सदर प्रकरणी आरोपींना अधिक विश्वासात घेवून तपास केला असता, यातील आरोपी अभिषेक शिंदे याची आत्या या कोरोना महामारीचे काळात १२ मे, २०२१ रोजी सुश्रूत हॉस्पिटल येथे उपचार घेत असतांना मयत झाल्या होत्या. त्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी अभिषेकने त्याचे साथीदार धनंजय भवरे व पवन सोनवणे यांना प्रत्येकी १० हजार रूपये देण्याचे कबूल केले. तसेच, डॉ. प्राची पवार यांना अद्दल घडवायची या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला करण्याचे ठरवले होते. त्यानुसार आरोपी अभिषेक शिंदे याने भद्रकाली परिसरातून एक धारदार चॉपरसारखे हत्यार खरेदी केले होते. तसेच घटनेच्या दिवशी डॉ. प्राची पवार हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर त्यांचे गाडीचा पाठलाग करून पवार हाऊसचे गेटवर अगोदर पोहचले. ठरल्याप्रमाणे त्याचे वरील दोन साथीदारांसह डॉ. प्राची पवार यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केल्याचे उघडकीस आल्याचे ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
NCP Leader Dr Prachi Pawar Attack Case 3 Arrested
Nashik Rural Police Investigation Crime Attack