मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या कांदा उत्पादक शेतकरी फारच मेटाकुटीला आला आहे. सरकारने ३५० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, याचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी उचलला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने कांद्याला जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ ३१ मार्च पर्यंत विक्री झालेल्या कांद्यालाच मिळेल असा फतवा शासनाने काढला होता. याचा गैरफायदा घेऊन व्यापाऱ्यांनी आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कात्रीत पकडून कवडीमोल कांदा खरेदी केला. अशा प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
मुंडे यांनी पुढे म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात या अडवणुकीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचा कांदा बदमाश व्यापाऱ्यांनी २५ पैसे प्रतिकिलोने घेतला. त्या शेतकऱ्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील? शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याबरोबरच अनुदानासाठी पात्र कांदा विक्रीस किमान १५ दिवसांची मुदतवाढ करण्यात यावी. तसेच महाराष्ट्राच्या बाहेर विकलेल्या कांद्याला देखील अनुदान देण्यात यावे, अशी आग्रही मागणी मुंडे यांनी सरकारकडे केली आहे.
शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याबरोबरच अनुदानासाठी पात्र कांदा विक्रीस किमान 15 दिवसांची मुदतवाढ करण्यात यावी. तसेच महाराष्ट्राच्या बाहेर विकलेल्या कांद्याला देखील अनुदान देण्यात यावे. @mieknathshinde
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 4, 2023
NCP Leader Dhananjay Munde on Onion Farmer Issue