मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ जामिनावर तुरुंगातून बाहेर असल्यापासून राजकारणात सक्रीय आहेत. पण त्यांच्या मागच्या कटकटी अद्याप संपलेल्या नाहीत. एका खटल्यासाठी त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित व्हायचे होते. पण ते वेळेवर न पोहोचल्याने न्यायाधिशांनी वॉरंटची तंबी दिली आणि थोड्याच वेळात भूजबळ न्यायालयात दाखल झाले.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यावर पक्षात खळबळ उडाली. पवारांची मनधरणी करण्याकरिता सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर दाखल झाले. तिथे पवारांसोबत सर्व नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीत स्वतः भुजबळ देखील होते. आणि त्याचवेळी महाराष्ट्र सदनच्या घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या खटल्यावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीला भुजबळ यांना प्रत्यक्ष हजर राहणे अनिवार्य होते.
समीर आणि पंकज भुजबळ यांनी खटल्याला उपस्थित राहणे शक्य होणार नाही, असे न्यायालयाला कशविले होते. तशी परवानगीही घेतली होती. इतर ३० आरोपी न्यायालयात हजर होते. विशेष पीएमपीएल न्यायालयात ही सुनावणी सुरू होती आणि जवळपास दीड तास होऊन गेला तरीही भुजबळ पोहोचले नव्हते. त्यांच्या वकिलांना न्या. राहुल रोकडे यांच्याकडून वारंवार विचारणा करण्यात येत होती आणि प्रत्येकवेळी निघाले आहेत पोहोचतीलच असे उत्तर देण्यात येत होते.
भुजबळांना उशीर होत असल्यामुळे त्यांचे वकील न्यायाधिशांची माफीही मागत होते. पण न्यायाधिशांनी वॉरंट जारी करण्याची तंबी दिली. त्यानंतर वकिलांनी भुजबळांना निरोप दिला आणि १५ मिनीटांत ते न्यायालयात हजर झाले.
पवारांपेक्षा न्यायालय महत्त्वाचे
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शरद पवार यांचा हात पकडला आणि तेव्हापासून ते त्यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यावरही त्यांनी सर्वांत पहिले पवारांचेच आभार मानले. त्यामुळे त्यांच्या नेत्याने राजीनामा देण्याची घोषणा करणे त्यांच्यासाठी धक्कादायक होते. अश्यावेळी शरद पवारांसोबतच्या बैठकीला प्राधान्य देणे स्वाभाविक आहे. पण त्याहीपेक्षा न्यायालय महत्त्वाचे आहे, याची जाणीव न्यायाधिशांनी त्यांना करून दिली.
NCP Leader Chhagan Bhujbal Court Hearing