मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी तुरुंगाबाहेर आले आहेत. आर्थर रोड तुरुंगात सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर काही वेळापूर्वीच ते तुरुंगाबाहेर आले आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे देशमुख यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. नवीन वर्षाचे स्वागत ते आता तुरुंगाबाहेर करणार आहेत. बाहेर येताच देशमुख यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली आहे.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला होता की, देशमुख यांनी १०० कोटी रुपये दरमहा वसुलीचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर याप्रकरणाची ईडी आणि सीबीआयने गंभीर दखल घेतली. देशमुख यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून ते तुरुंगात होते. त्यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर रोजी १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. मात्र, सीबीआयने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी झाली. देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे देशमुख यांचा जामीन कायम राहिला. त्यानंतर आता त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. तब्बल ११ महिन्यांनी ते तुरुंगाबाहेर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे तुरुंगाबाहेर स्वागत केले.
बाहेर येताच म्हणाले
तुरुंगाबाहेर येताच देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला खोट्या आरोपांमध्ये फसविण्यात आले. परमबीर सिंग यांनी माझ्यावर चुकीचा आरोप लावला. त्यांचे आरोप ऐकीव माहितीवर आहेत. त्यांनीच कोर्टात सांगितले की, माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही. तसे प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयात दिले आहे. परमवीर यांच्या अत्यंत जवळचे असलेले सचिन वाझे यानेही माझ्यावर आरोप केले. पण वाझे यांच्यावरच गंभीर आरोप आहेत. त्यामुळे वाझेच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे. माझ्यावरील आरोपांमध्ये तथ्य नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी न्याय दिला. मी सगळ्यांचे आभार मानतो. शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेते माझ्या पाठिशी राहिले, मला सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचेही आभार, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कोणतेच आरोप सिद्ध न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. सत्य परेशान हो सकता लेकिन पराजित नही। याचीच प्रचिती येथे होते. अनिल देशमुख यांच्या संपूर्ण प्रकरणाचा वेध घेणारा हा व्हिडिओ pic.twitter.com/ySk5avXcvS
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 28, 2022
NCP Leader Anil Deshmukh Release from Jail First Reaction
Relief High Court Bail CBI Order