मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. काल, सोमवारी अजित पवार यांनी त्यांचे पुणे येथील नियोजित कार्यक्रम अचानक रद्द कल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले. काल, कार्यक्रम रद्द केल्यानंतर आज अजित पवार कुठे आहेत, काय करणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात अजित पवार यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भारतीय जनता पक्षासोबत जाणार असल्याचे वृत्त काही दिवसांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांचे अजित पवार यांना समर्थन आहे. अजित पवार यांच्या सोबतीने भाजप नवे समीकरण मांडून सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावेळी अजित पवार यांच्या या सर्व हालचालींना पक्षप्रमुख शरद पवार यांचे समर्थन असल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना अजित पवार यांनी म्हटले आहे की, सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असे पवार यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1647949255909441541?s=20
NCP Leader Ajit Pawar Todays Program