मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घडलेली एक विलक्षण घटना म्हणजे पहाटेचा शपथविधी. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. डोळे चोळून झोपेतून उठण्यापूर्वीच राज्यात सरकार स्थापन झाल्याची बातमी आली होती. ही घटना कुणालाही विसरता येण्यासारखी नाही.
त्यानंतरच्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर तेही सरकार कोसळले आणि महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आले. पण एका घटनेमागचं कोडं अद्याप उलगडलेलं नाही, ते म्हणजे पहाटेचा शपथविधी. याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना अनेकदा विचारले गेले. पण दोघेही त्यावर बोलत नाहीत. अजितदादांना अलीकडेच पुन्हा एकदा हा सवाल करण्यात आला. पण आता त्यांनी संतापून उत्तर दिले. पहाटेच्या शपथविधीवर कधीही बोलणार नाही, हे आधीच सांगितले आहे. त्यामुळे त्यावर चर्चा नाहीच, असे ते म्हणाले. हा शपथविधी शरद पवारांची खेळी होती, असे जयंत पवार एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यावर अजितदादांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला. तर दादांनी त्यावर कधीही बोलणार नाही, असे आधीच स्पष्ट केले असल्याची प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र यांना अडकविण्याची चर्चा?
आपण उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना अडकविण्याची कुठलीही झालेली नव्हती, असेही अजितदादांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महाविकास आघाडीने आपल्याला तुरुंगात टाकण्यासाठी माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना टार्गेट केले केल्याचा आरोप केला होता. त्यावर देवेंद्र यांना अडकविण्याची कुठलीही चर्चा झाली नव्हती, असे त्यांनी सांगितले.
कोड्यात बोलू नये
देवेंद्र फडणवीस यांना अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे सुतोवाच आशिष शेलार यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार म्हणाले, ‘प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे बोलण्याचे. पण कोड्यात बोलू नये. आणि कोण काय बोललं यावर प्रतिक्रिया द्यायला आम्हाला वेळही नाही.’
NCP Leader Ajit Pawar on Morning Swearing Ceremony