मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा २०१९ सालचा पहाटेचा शपथविधी ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वांत मोठी घटना आहे. हे सारे अचानक कसे काय घडले, याबद्दल फडणवीस आणि अजितदादा वगळता कुणालाच माहिती नाही. त्यामुळे दोघांनाही सातत्यांना प्रश्न विचारले जातात. अजितदादांनी मात्र याबद्दल आता स्पष्टच सांगितले आहे.
अलीकडेच अजितदादांना एका वृत्तवाहिनीने पुन्हा एकदा याच प्रश्नावरून छेडले. आतापर्यंत वेळ आल्यावर बोलेन असे सांगणारे अजितदादा पुन्हा तोच प्रश्न आल्याने काहीसे वैतागले. जेव्हा केव्हा आत्मचरित्र लिहेन, त्यात पहाटेच्या शपथविधीबद्दल सविस्तर लिहीणार आहे, असे अजितदादांनी स्पष्टपणे सांगितले. विशेष म्हणजे आत्मचरित्रात कुणाचीही भीती न बाळगता आणि परिणामांची चिंता न करता सारंकाही लिहीणार आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे कुणाची भीती आणि कशाचा परिणाम हे दोन नवे प्रश्न अजितदादांच्या विधानामुळे निर्माण झाले आहेत. ‘आत्मचरित्रात पहाटेच्या शपथविधीबद्दल लिहील्यानंतर कुणाला काय वाटेल, याची मला चिंता नसेल. सुरुवातीपासून सगळं लिहीणार आहे. त्यासाठी किंमत मोजावी लागली तरी मला फरक पडणार नाही,’ असेही अजित पवार म्हणाले.
फडणविसांचा चिमटा
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. पहाटे शपथविधी होणार आहे, याबद्दल शरद पवार यांना माहिती होते, असे फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजितदादा शपथविधीसाठी आले होते, असेही फडणवीस म्हणाले होते.
हे खोटे आहे
फडणवीस यांनी मला पहाटेच्या शपथविधीविषयी माहिती असल्याचा केलेला दावा खोटा आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. तर अजितदादांनी मी कुणाशी बोलायचे हा माझा अधिकार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. एकूणच रहस्य उलगडत नाही तोपर्यंत पहाटेचा शपथविधी हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठे गुपित ठरणार आहे.
NCP Leader Ajit Pawar on Morning Oath Ceremony