ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवशाहीर व इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नव्हतेच, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासाचा विपर्यास केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडून वारंवार करण्यात येतो, तर या उलट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव करतात. त्यामुळे सध्या निर्माण होत असलेल्या दोन ऐतिहासिक चित्रपटात संदर्भ मोठा वाद निर्माण झाला आहे.
इतिहास हा गतकाळातील घटनांचा मागोवा किंवा आढावा असतो, त्यामध्ये कालानुरूप जसजसे संशोधन होते तसे बदल होत जातात असे म्हटले जाते. परंतु काही वेळा इतिहासातील घटना आणि दाखले या संदर्भात प्रचंड मतभेद होतात, आणि त्यातून मोठा वाद निर्माण होतो. सध्या महाराष्ट्रात देखील छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील काही घटना तसेच त्यांच्या काळातील मावळे, सरदार आणि अन्य ऐतिहासिक बाबी संदर्भात मोठा वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. याला कारण म्हणजे शिवकालातील अनेक घटनांवर आधारित सध्याच्या काळात चित्रपट तयार होत आहेत. यासाठी वेगवेगळे संदर्भ ग्रंथ वापरले जातात.
विशेष म्हणजे या चित्रपटांसाठी राज ठाकरे यांनी सहकार्य केले असून त्यांचे मार्गदर्शन देखील लाभत आहे. परंतु हे दोन्ही चित्रपट इतिहासाचा म्हणजे इतिहासाचा करणारे आहेत, असे खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे म्हणणे आहे, आता त्यांच्या या वक्तव्याला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक प्रकारे पाठिंबाच दर्शविल्याने या दोन्ही चित्रपटाबद्दल मोठा वाद उफाळला आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा व चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केली, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने त्या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शीत केलेला ‘वेडात वीर दौडले सात’या चित्रपटांवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप करत आता चित्रटसृष्टीतही तेच होत असल्याचे म्हटले आहे. सध्या हर हर महादेव हा मराठीतील पहिला बहुभाषिक सिनेमा प्रदर्शित झाला असून त्यानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी वेडात मराठी वीर दौडले सात या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. पुढील वर्षी म्हणजे सन २०२३मध्ये दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
विशेष म्हणजे हा मराठीतील दुसरा बहुभाषिक सिनेमा ठरणार असून मराठीसह हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता खिलाडी अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच तीन – चार दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा दिला आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला होता.
या संदर्भात वाद निर्माण झालेला असतानाच आता या वादात माजी मंत्री जितेंद्र आवड यांनी उडी घेतली आहे आव्हाड यांनी ट्विट करत शिवाजी महाराजांचा चुकीचा खोटा, इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी केल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांचा चुकीचा, खोटा इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे यांनी सुरु केली, जाणता राजा हे महानाट्य हे त्याचे एक रुप करून त्यांचे लिखित पुस्तक केले होते. तीच चुकीची परंपरा आता चित्रपटसृष्टीत काही जण पुढे नेत आहेत. आम्ही विरोध करुच पण संभाजीराजे ह्यांच्या रुपाने एक आवाज मिळाला.
संभाजी राजे यांनी चित्रपट निर्मात्यांना उद्देशून म्हटले होते की, सिनेमॅटिक लिबर्टी सध्या सुरू असून ते ठीक आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळ्यांवर आधारित चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास केला आहे. शिवाजी महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावे आपण काहीही दाखवत आहोत. इतिहासाचा गाभा सोडता कामा नये,असेही संभाजीराजे म्हणाले होते.
तुम्ही इतिहासावर चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट आहेत. पेंढारकर यांनी काय छान चित्रपट बनवले होते. मात्र आता लोकांना आवडते म्हणून काही चित्रपट बनवायचे का? वेडात मराठे वीर दौडले सात, काय तो पोशाख ? हे काय मावळे आहेत का? असा प्रश्न संभाजी राजे यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी इतिहासाचा विपर्यास करणारे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे असा संताप व्यक्त केला.
तसेच माझी सूचना आहे की तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट काढायचे आहे तर त्यासाठी ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे, अशी मागणी देखील संभाजी राजे यांनी केली.
चार महिन्यांपूर्वी देखील असाच वाद निर्माण झाला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तेव्हा देखील पुरंदरेंच्या लेखनावर आक्षेप घेतला पुरंदरेंच्याच जवळपास पन्नास वर्ष जुन्या व्याख्यानाचा संदर्भ देत आव्हाडांनी टीकेची झोड उठवली होती. तसेच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी बांधली यावरून देखील काही महिन्यांपूर्वी वादांग रंगले होते यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे विरूद्ध माजी मंत्री जितेंद्र आवड आणि माजी मंत्री छगन भुजबळ असा वाद रंगला होता.
NCP Jitendra Awhad Allegation on Babasaheb Purandare