नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक सुरू असतानाच वीज गायब झाली मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोबाईल बॅटरीच्या उजेडावर पक्षबांधणीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
‘राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा’ या दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून सकाळच्या सत्रात जळगाव केल्यानंतर नाशिक जिल्हयातील चांदवड विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या.
राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत असून या दौऱ्यात पक्षवाढ आणि बुथ कमिट्या स्थापन करण्याचे आवाहन जयंत पाटील करत आहेत.
आज रात्री अकरा वाजता चांदवड विधानसभा मतदारसंघाची बैठक सुरू असतानाच अचानक वीज गायब झाली मात्र वीज येईल याची वाट न बघताच जयंत पाटील यांनी मोबाईल बॅटरीच्या उजेडात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जयंत पाटील यांनी मोबाईल बॅटरी सुरू करताच संपूर्ण सभागृहात मोबाईल बॅटरीचा उजेड करुन पक्षाप्रती व जयंतराव पाटील यांच्या पक्ष वाढीच्या मेहनतीला कार्यकर्त्यांनी दाद दिली.