कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळीच पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेसह सध्याचे देशातील वातावरण, राजकीय स्थिती यासह अनेक बाबींवर त्यांनी भाष्य केले. पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे असे
– राज ठाकरे हे कधी कधी उगवतात. दोन-चार वर्षे ते भूमीगत असतात. पुन्हा २ वर्षे ते काय करतात हे सांगता येत नाही. बाहेर आले की व्याख्यानं देतात
– राज ठाकरे यांची भूमिका कधीही कायम नसते ते सतत भूमिका बदलतात. यापूर्वी ते मोदींवर टीका करत होते आणि आता ते मोदींबाबत अनुकूल दिसत आहेत
– मुंबई महापालिकेत मनसे किती मते घेईल हे काही सांगता येत नाही. यापूर्वीची कामगिरी बोटावर मोजण्याऐवढीच आहे
– महाविकास आघाडी सरकार उत्तम चालले आहे. समन्वयही चांगला आहे. आम्ही तिन्ही एकत्र आहोत. सत्तेचा गैरवापर जनतेला दिसतो आहे. येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसतील
– लोकशाही मजबूत होणे आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्षही सक्षम हवा. नाही तर पुतिन सारखे होऊन बसेल
– ईडी हा शब्द यापूर्वी कुणालाही माहित नव्हता. आता मात्र तो घराघरात पोहचला. तपास यंत्रणांचा गैरवापर कसा आणि किती होतो, हे सर्वांना दिसतंय
– जेव्हा देशाची ठोस भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा राजकारण करणे योग्य नाही. युक्रेन आणि रशिया युद्धात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य भूमिका घ्यावी लागते. अशात राजकारण नको.
– युपीएचे अध्यक्षपद मला नको आहे. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते सर्व मी करेन.
– किरीट सोमय्या हे केवळ प्रसिद्धीसाठी सर्व काही करताय. दुसरे काही नाही.
– शाहू महाराजांना मानणारे आम्ही आहोत. त्यामुळे जातीयवादाला जराही थारा देत नाही. त्यामुळे त्यावर राजकारण तर मुळीच नाही.