नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे देशभरात सध्या वादंग सुरू आहे. भाजपने या चित्रपटाची प्रशंसा करत बाजू घेतली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तर विरोधकांनी या चित्रपटाबद्दल प्रतिकुल मत व्यक्त करत रान उठवले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चित्रपटाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या बॉलिवूड चित्रपटात काश्मिरी खोऱ्यातून पंडितांच्या पलायनाची कथा दाखवण्यात आली आहे. मात्र त्यामुळे राजकीय तणाव कायम आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या चित्रपटावरून भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत असा चित्रपट प्रदर्शनासाठी पास करू नये, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली युनिटच्या अल्पसंख्याक विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार म्हणाले, अशा चित्रपटाला प्रदर्शनासाठी मान्यता मिळायला नको होती. मात्र याला कर सवलत देण्यात आली असून देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्याच व्यक्ती चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
पवार म्हणाले की, काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पळून जावे लागले, परंतु मुस्लिमांनाही अशाच प्रकारे लक्ष्य केले जात असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणून दिले. काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी गट जबाबदार आहेत. तसेच नरेंद्र मोदी सरकारला काश्मिरी पंडितांची खरोखर काळजी असेल तर त्यांनी त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत आणि अल्पसंख्याकांमध्ये नाराजी पसरवू नये.
यावेळी पवारांनी काश्मीर प्रश्नात जवाहरलाल नेहरूंचे नाव ओढल्याबद्दल भाजपवर निशाणा साधला. काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले तेव्हा व्ही.पी. सिंग पंतप्रधान होते. तसेच व्हीपी सिंग सरकारला भाजपचा पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद सईद हे गृहमंत्री होते आणि जगमोहन जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते, नंतर त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवली.
जगमोहन यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी राजीनामा दिला होता आणि राज्यपालांनी काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून बाहेर पडण्यास मदत केली होती, असे पवार म्हणाले.
दरम्यान, या चित्रपटाबाबत काँग्रेसनेही सरकारला घेरले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सरकार समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला.