नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून त्यांनी काही आमदारांना घेऊन सूरत गाठले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर होणार असल्याच्याही चर्चांना उधाण आले आहे. भाजपने ऑपरेशन लोटस सक्रीय केले असून शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे मुख्य सूत्रधार शरद पवार यांनी प्रथमच भाष्य केले आहे. पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार उलथवून लावण्यासाठी गेल्या अडीच वर्षांत अनेक प्रयत्न झाले. आता तर ही तिसरी घटना आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार येण्यापूर्वीच आमच्या काही आमदारांना हरियाणात ठेवण्यात आले होते. पण ते बाहेर पडले आणि आमचे सरकार स्थापन झाले. विशेष म्हणजे सरकार अडीच वर्षे चांगले चालू आहे.
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. आमचे एकही मत इकडून तिकडे गेलेले नाही. या निवडणुकीत भाजपला १३४ मते मिळाली आहेत. अशा निवडणुकांमध्ये क्रॉस व्होटिंग होतच असते. मी गेल्या 50 वर्षांत हे अनेकदा पाहिले आहे. त्यात नवीन काही नाही. क्रॉस वोटिंग झाल्यानंतरही सरकार उत्तम चालल्याची अनेक उदाहरणे आहेत.
एकनाथ शिंदेंमुळे निर्माण झालेल्या पेचाबद्दल पवार म्हणाले की, महाराष्ट्रात राजकीय फेरबदलाची सध्या तरी गरज नाही. यापुढेही उद्धव ठाकरे सरकार कायम राहणार आहे. शिंदे यांचे प्रकरण हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यांची नवी जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवणार आहेत. यातून काहीतरी मार्ग निघेल याची मला खात्री आहे. तिन्ही पक्षांमध्ये आमची चांगली समज आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीबाबत शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी सरकार चांगले चालवले आहे. सायंकाळपर्यंत शिवसेना त्यांचा निर्णय आम्हाला कळवेल. त्यानंतर आम्हीही आमची बैठक घेऊ. माझी दिल्लीतील बैठक संपली की मी मुंबईत जाणार आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
ncp chief sharad pawar on thakre government and eknath shinde issue