मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कट्टर विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षासोबत नागालँडमध्ये जाण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिवाय राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, भाजपला तेथे पाठिंब्याची गरज नसतानाही राष्ट्रवादीना पाठिंबा का दिला असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अखेर आता सर्व घटनाक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँडमध्ये ७ आमदार निवडून आले आहेत. निवडणुकीच्या काळातही राष्ट्रवादीने तेथील मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला होता. आमचा पाठींबा हा तेथील मुख्यमंत्र्यांना आहे. आमची अंडरस्टँडिंग त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत युती केलेली नाही. नागालँडमधील एकंदरीत चित्र बघितल्यानंतर तेथे एक प्रकारचे स्थैर येण्यासाठी आमची मदत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे, पण भाजप म्हणून नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पवार पुढे म्हणाले की, मला आश्चर्य वाटते आहे की, मेघालय आणि शेजारच्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्या निवडणुकींच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेही गेले होते. नरेंद्र मोदी यांनी मेघालयाच्या प्रचारादरम्यान राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. त्यांचा पराभव करा असे सांगितले. आणि निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हणत पवार यांनी मोदी, शहांसह भाजप नेत्यांना चिमटा घेतला आहे.
NCP Chief Sharad Pawar on Nagaland BJP Support