मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोकणातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. यासंदर्भात तेथे आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची नक्की भूमिका काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई इथे माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. पवार म्हणाले की, बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर बळाचा वापर करण्यात आला. या विषयाबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. त्यावर स्थानिक आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यातून काय निष्पन्न होते हे पाहण्याची गरज आहे. यासाठी उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. इतर काही प्रश्न असतील तर त्यावरही मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्याची तयारी सामंत यांनी दाखवली.
एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. काल रिफायनरीला झालेल्या विरोधात आंदोलकांची तीव्र नाराजी माध्यमांमधून समोर आले. कोकणात नवीन काही होत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे. उद्या होणाऱ्या बैठकीत काही मार्ग निघाल्यास आनंद आहे. जर नाही निघाला तर त्यावर मार्ग काढण्यासंबंधात चर्चा करता येईल.
शरद पवार म्हणाले की, रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून बळाचा वापर केला जात असल्याची तक्रार आम्ही आज ना. उदय सामंत यांच्याकडे मांडली. पण त्यांनी अशी कुठलीही कारवाई होत नसल्याचे सांगितले. हा प्रकल्प प्रस्तावित असून सध्या केवळ माती परीक्षण सुरू असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली, असे शरद पवार म्हणाले. त्याचवेळी काम थांबवून विरोधक आणि प्रशासनाची बैठक घेण्याची विनंती त्यांनी मान्य केली असून उद्या ही बैठक बारसूमध्ये होणार आहे, असेही पवार म्हणाले.
https://www.facebook.com/PawarSpeaks/videos/922765235720316
NCP Chief Sharad Pawar on Kokan Barsu Refinery Project