मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू आहे. यासंदर्भातील हालचाली दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू झाल्या आहेत. यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार पहिल्यांदाच बोलले आहेत. त्यांच्या उत्तरामुळे काहीतरी गडबड चालली आहे असे स्पष्ट होत आहे.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज एका कामानिमित्त मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेचा विषय वेगळा असला तरीही अजित पवार यांची भूमिका आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली याच विषयावर प्रश्न विचारण्यात आले. एकीकडे संजय राऊत यांनी दिल्लीत मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विधान केले होते.
दुसरीकडे भाजपवर नाराज होऊन साताऱ्यात जाऊन बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने नागपूरला रवाना झाले आहेत. गृहमंत्री अमित शहांनी त्यांना बोलावून घेतले आहे. अश्या परिस्थितीत याबाबत काही हालचाली खरच सुरू आहेत का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर सरकार मुख्यमंत्री बदलणार असेल तर त्याची माहिती आम्हाला असण्याचे काहीच कारण नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांचे भाकित खरे ठरण्याच्या दृष्टीने राज्यात आणि केंद्रात हालचाली सुरू आहेत. अश्या परिस्थितीत आपली भूमिका काय आहे, या प्रश्नावर मला अश्या पद्धतीची कुठलीच माहिती नाही, असेही पवार म्हणाले. संजय राऊत यांचे विधान असेल तर ते पत्रकार आहेत आणि तुम्हीही पत्रकार आहात. त्यामुळे तुम्हाला लोकांनाच अधिक माहिती आहे, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंसोबत चर्चा नाही
अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले पोस्टर्स जागोजागी झळकत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे अजित पवार मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील का, असा प्रश्न केला असता ‘यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही’ असे उत्तर शरद पवार यांन दिले.
NCP Chief Sharad Pawar on Chief Minister Change Politics