मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्षनेते अजितदादा कुठल्या ना कुठल्या विधानामुळे सतत चर्चेत असतात. बरेचदा त्यांच्या विधानांचा किंवा कृत्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना सहन करावा लागतो. सध्या अजितदादांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या अश्याच एका विधानावरून शरद पवारांना माध्यमांना उत्तरं द्यावी लागत आहेत.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान अजितदादांनी संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणता येणार नाही, ते स्वराज्य रक्षक होते, असे विधान केले होते. या विधानानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर खडसून टिका केली. अजितदादांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सभागृहातील भाषणादरम्यान अजितदादांनी हे विधान केल्यामुळे ते रेकॉर्डवर देखील आलं आहे. पण त्याहीपेक्षा मोठा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांना भोगावा लागत आहे. सातत्यानं माध्यमांकडून प्रश्न विचारले जात असताना, अलीकडेच शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.
माध्यमांनी त्यांना जितेंद्र आव्हाड व अजितदादा यांच्या विधानांवर प्रतिक्रिया मागितली असताना आपण केवळ अजित पवार यांचं भाषण ऐकलं त्यामुळे त्यावरच बोलणार, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘संभाजी महाराजांना देण्यात येत असलेल्या उपाधीवरून वाद करण्याचं काहीच कारण नाही. त्यांना स्वराज्य रक्षक म्हणा किंवा धर्मवीर म्हणा… दोन्ही उपाधी योग्यच आहेत’, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांची ही भूमिका त्यांच्या स्वभावाला साजेशी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार व संभाजी महारजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी मात्र अजितदादांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्य रक्षक म्हणणं कधीही संयुक्तिक ठरेल. कारण संभाजी महाराजांचं कार्य मोठं आणि व्यापक होतं, असं डॉ. कोल्हे म्हणाले.
ठाण्यातले धर्मवीर…
संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायला हरकत नाही, पण ठाण्यातल्या एका नेत्याला विद्यमान मुख्यमंत्री व त्यांचे कार्यकर्ते धर्मवीर संबोधतात. माझी त्याबद्दलही तक्रार नाही, अशी कोटी शरद पवार करतात.
आस्था महत्त्वाची
संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणून किंवा स्वराज्य रक्षक म्हणून संबोधण्यामागे आस्था महत्त्वाची आहे. त्यामागे चांगला विचार असेल तर या दोन्ही उपाधींवरून वाद घालण्याचं मुळीच कारण नाही, असंही शरद पवार म्हणाले.
NCP Chief Sharad Pawar on Ajit Pawar Statement
Chhatrapati Sambhaji Maharaj Politics