मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरें यांच्यावर टीका केल्यामुळे राज्यभर नवा वाद निर्माण झाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे खोटा इतिहास सांगणारी असून त्यांच्या लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आणि वादाला सुरुवात झाली. तर दुसरीकडे पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक केलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनीदेखील हे पत्र शेअर केलं असून शरद पवारांवर टीका केली आहे.
इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्या प्रसंगी पवार बोलत होते. शाहू महाराज छत्रपती, न्या. बी. जी. कोळसे पाटील, डॉ. पी. डी. जगताप, श्रद्धा कुंभोजकर, राजकुमार घोगरे आणि चंद्रशेखर शिखरे या वेळी उपस्थित होते. त्यावेळी पवार म्हणाले, की महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला होता. मात्र, बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. अन्य घटकांचे महत्त्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास आणि दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? शिवाजी महाराजांना दिशा फक्त जिजाऊ यांनीच दिली. पुरंदरे यांनी केलेली मांडणी सत्यावर विश्वास ठेवणारे कधीही मान्य करणार नाहीत.
एकीकडे पुरंदरेंचं कौतुक आणि दुसरीकडे टिका अशी शरद पवारांची भूमिका असल्याचे म्हणत निलेश राणे यांनी पवारांवर टिका केली आहे. शरद पवारांनी १९७४ मध्ये लिहिलेलं एक पत्र राणेंनी ट्विटरवर शेअर केले आहे. या पत्रामध्ये शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुक केलं होतं. निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पवार साहेबांचे राजकारण किती खालच्या पातळीचे असू शकतं याचा हा धडधडीत पुरावा.
१६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचं लिखाण चुकीचं वाटू लागलं आहे. याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत”. धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर, शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचं योगदान काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नव्या पिढीसमोर वास्तववादी इतिहास येण्याची गरज आहे, असं मत पवार यांनी व्यक्त केलं.
NCP Chief Sharad Pawar Controversial Statement Babasaheb Purandare