मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात काही खळबळजनक खुलासे केले आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचा आणि धक्कादायक दावा महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या संदर्भात आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात या आत्मचरित्राची चांगलीच चर्चा आहे.
शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ याचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा २ मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या सभागृहात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या आत्मचरित्राची चर्चा आधीच व्हायला लागली आहे. कारण यामध्ये शिवसेना आणि भाजपची युती २०१९ मध्ये का तुटली याचे धक्कादायक कारण त्यांनी सांगितले आहे. ज्या शहरी भागात शिवसेनेचे वर्चस्व होते तेथून शिवसेनेला हद्दपार करण्याचा निर्धार भाजपने केला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेला हटविल्याशिवाय भाजपला वर्चस्व स्थापन करता येणार नाही, असा भाजपचा सरळ राजकीय हिशेब होता, असे शरद पवार म्हणतात. २०१९ पूर्वी दोघेही एकत्र सत्तेत होते. त्यावेळीच शिवसेनेच्या नेतृत्वाला व ज्येष्ठ नेत्यांना भाजप आपल्या पक्षाच्या जीवावर उठला आहे, याची पूर्ण माहिती होती. त्यामुळे नेतृत्वापासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक संताप होता. सत्तेत एकत्र असल्यामुळे उद्रेक झाला नाही. पण आग धुमसतच होती, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
तिसऱ्याचा लाभ
भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर वाढत गेल्याने तिसऱ्या पक्षाला लाभ मिळाला हे साऱ्या महाराष्ट्राने बघितले. पण खुद्द शरद पवार यांनी स्वतःच त्याची कबुली दिली आहे. दोघांमधील अंतर वाढत जाणे आमच्यासाठी शुभसंकेत होते, असे शरद पवार आपल्या आत्मचरित्रात म्हणतात.
शिवसेनेचे उच्चाटन करायचे होते
भाजपला शिवसेनेचे उच्चाटन करायचे असल्यामुळे त्यांनी २०१९ मध्ये जागावाटप ठरले असतानाही जास्तीचे उमेदवार उतरवले. सुरुवातीला १७१ शिवसेना आणि ११७ भाजप असे ठरले होते. पण भाजपने १६४ उमेदवार उतरवले आणि ५० मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या पुढे आपल्या पक्षातील बंडखोर उतरवले, असा दावा देखील पवार यांनी केला आहे.
NCP Chief Sharad Pawar Autobiography Politics