नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काल रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सर्वपक्षीय आमदारांचे स्नेहभोजन पवार यांच्या निवासस्थानी होते. त्याप्रसंगी गडकरी हे पवार यांच्या सोबत होते. या घटनेला काही तास उलटत नाही तोच आता शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांची तब्बल २० मिनिटे चर्चा झाली आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला वारंवार खिंडीत गाठले जात आहे. त्यातच केंद्रीत तपास संस्थांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांवर कारवाई होत आहे. खासकरुन राष्ट्रवादीचे नेते रडारवर असल्याचे बोलले जाते. अशातच पवार आणि मोदी यांची भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्येही पवार-मोदी भेट झाली होती. आता सुद्धा ही भेट झाली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. तर, अन्य मंत्र्यांवरही लवकरच कारवाई होणार असल्याचे बोलले जाते. अशा स्थितीत मोदी-पवार भेट झाल्याने यापुढील काळात काही वेगळे चित्र दिसणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.