नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सिडकोचे ऑफिस बंद करण्याचा आणि त्यानंतर येथील कर्मचारी अन्यत्र नेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याप्रकरणी माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नाशकात भाजपचे ३ आमदार आणि शिंदे गटाचे पालकमंत्री असताना नाशिक सिडकोचे कार्यालय कसे बंद होऊ शकते, असा सवालच भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, नाशिकमध्ये सिडको माझ्यासमोर निर्माण झालं. शहरात सिडकोच्या ६० हजार मिळकती आहेत. सिडकोकडे नागरिकांची अनेक कामे असतात. असे असताना सिडकोचे ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद सिडकोचे काम त्यांना करू द्या. नाशिकच्या सिडकोचे काम नाशिक सिडकोला करू द्या. नाशिकचे काम औरंगाबादला नेण्याची गरजच काय, असा प्रश्नही भुजबळांनी विचारला.
भुजबळ म्हणाले की, सिडको कार्यालय बंद करण्यामागे कुणाचा दबाव आहे की यात काही वेगळं राजकारण आहे? भाजपचे ३ आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या गटाचे पालकमंत्री असताना सिडकोचे ऑफिस कसे बंद होऊ शकते. भाजप आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालायला नको का. आमचं ऑफिस आमच्याकडे ठेवा आणि त्यांना काम करू द्या. आमचं सिडकोचे ऑफिस हलवू नका, अशी विनंती भुजबळ यांनी यावेळी केली आहे.
https://www.facebook.com/ChhaganCBhujbal/videos/5377953715650306/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing
NCP Chhagan Bhujbal on Nashik Cidco Office Close