मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसमधील खदखद अखेर रविवारी व्यक्त झाली आणि अजित पवार यांनी पक्षातील मातब्बर नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. काही दिवसांपूर्वीच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघटनात्मक बदल करत काही नवीन जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्या अंतर्ग खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले होते. त्यानंतर अजित पवारांच्या मनात गेल्या १८ वर्षांपासून सुरू असलेली खदखद बाहेर पडली आणि अजितदादांनी भाकर फिरविली.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दुरावा गेल्या काही वर्षांत लपून राहिलेला नाही. राष्ट्रवादीतील या दोन्ही साहेबांमध्ये कायमच ठिणग्या पडल्या आहेत. याची सुरुवात २००४ मध्ये झाली. २००४ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद येणे अपेक्षित होतं. मात्र पक्षाने मुख्यमंत्रिपदाची उत्तम संधी गमावली होती. २००४ मध्ये मुख्यमंत्रीपद सोडणे ही सर्वात मोठी चूक होती, असं अजित पवार यांना बोलूनही दाखवलं होतं. त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने अजित पवार नाराज झाले होते. २०१० मध्ये आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता.
तसेच २०१२मध्ये अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यावेळी अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने योग्य साथ न दिल्याने अजित पवार नाराज होते. त्यामुळेच पार्थ पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला असं बोललं जातं. या निवडणुकीत पार्थ पवार यांच्या उमेदवारीला शरद पवारांनी विरोध केल्याचेही बोलले जात आहे. मात्र त्यानंतरही पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला. यावेळीही अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद स्पष्टपणे दिसून आले.
प्रदेशाध्यक्षपदाची मागणी
पक्षातील संघटनात्मक बदल पाहता अजित पवारांनी प्रदेशाध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र, त्यावर कुठलाही निर्णय झाला नव्हता. मुख्य म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीमुळे अजितदादांमध्ये विशेष नाराजी होती.