मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे वरळी येथील जांबोरी मैदान येथे सुरू असलेल्या “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” च्या तिसर्या दिवशी राज्याचे आजी-माजी मुख्यमंत्री यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण उपस्थित होते. तर मविआशी संबधित माजी मुख्यमंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, उध्दव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहिले नाहीत. शरद पवार यांच्याकडून निमंत्रण मिळालं नसल्यानं उपस्थित राहण्याचा प्रश्न नाही असं सांगण्यात आलं. त्यानंतर अजित पवार यांनी आपण यदा कदाचित आमच्याकडून चुकून माजी मुख्यमंत्री यांना निमंत्रण देण राहिलं असेल तर माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटलं. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव घेणं टाळलं.
संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेल्या ६५ वर्षात झालेल्या सर्व मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण यांचा सन्मान अजित पवार यांच्या हस्ते तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सन्मान स्वीकारला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले आदींसह पक्षाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.