मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया आटोपली, निकालही जाहीर झालेत. मात्र, उमेदवारी वरून उठलेले वादळ अद्याप शांत होण्याची चिन्हे नाहीत. नाशिकचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. त्यांच्या आरोपांवर चर्चा सुरू असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमची चूक झाली, सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती, अशी जाहीर कबुली बारामतीमध्ये एका जाहीर सभेत बोलताना दिली.
ते म्हणाले की, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. फोडाफोडीचे राकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. मात्र सध्या जो शिकलेला मतदार आहे, त्याने कशा प्रकारचा कौल दिला आहे, हे आपण पाहिले, असे अजित पवार म्हणाले.
ती जागा काँग्रेसची , त्यांचाच अधिकार
“आमची जरा चूक झाली. मी त्याचा अगोदरच उल्लेख केला आहे. नाशीक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती. वडील काय किंवा मुलगा काय. तरुणांना संधी दिली पाहिजे. तरुण चांगेल काम करत असतील तर त्यांना संधी द्यायला हवी, या मताचा मी आहे. मात्र कोणाला उमेदवारी द्यावी, हा सर्वस्वी काँग्रेसचा अधिकार होता. त्यात मी लुडबूड करण्याचे काही कारण नव्हते. कारण ती जागा काँग्रेसला सुलटलेली होती,” असेही अजित पवार म्हणाले.
जाहीर राजकीय भाष्य
अलीकडच्या काळात अजित पवार राजकीय वातावरणावर जाहीर भाष्य करीत आहेत. त्यांची विधाने काँग्रेसच्या जिव्हारी लागणारी आहेत. दोनच दिवसांपूर्वी सत्यजित तांबेंना महाविकास आघाडीतील नेत्यांनी मदत केल्याचा दावा केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजितदादांचे विधान म्हणजे तांबेंना मदतीची जाहीर कबुलीच असल्याचे सांगितले होते. हे शाब्दिक द्वंद्व लक्षात घेतल्यास मविआमध्ये सारेकाही ऑलबेल नसल्याचे दिसते.