मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गंगापूर धरण पंपिंग स्टेशन ते १२ बंगला जलशुद्धीकरण केंद्र पर्यंत पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामामध्ये अनियमितता झाली असल्यास विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
याबाबत सदस्य ॲड राहुल ढिकले यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, या प्रकरणामध्ये कोणत्याही निविदा अटींचे उल्लंघन झाले नसून मान्यताप्राप्त उत्पादन कंपनीकडूनच भारतीय मानकांनुसार गुणवत्तापूर्ण पाईप खरेदी करण्यात आले आहे. हे काम सिंहस्थ सन २०२७- २८ पूर्वी होणे गरजेचे असल्याने २०२५ – २६ आर्थिक वर्षात काम पूर्ण करण्यात येईल.