नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विकी डोनर नावाचा सिनेमा काही वर्षांपूर्वी येऊन गेला. या सिनेमात एका स्पर्म डोनरची कहाणी दाखविण्यात आली आहे. पण दिल्लीतील एका रुग्णालयात एका महिलेल्या गर्भधारण प्रक्रियेत दुसऱ्याच माणसाचे स्पर्म वापरण्यात आले. या घटनेला चौदा वर्षे झाली. मुलं मोठी झाली. पण मुलांचा रक्तगट आपल्याशी का जुळत नाही, यावरून सातत्याने भांडणे होऊ लागल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.
२००९ सालचे हे प्रकरण आहे. एका महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला. त्या मुली आज चौदा वर्षांच्या आहेत. मात्र मुलींचे रक्तगट हा त्यांच्या पालकांच्या रक्तगटाच्या जेनेटिक ट्रान्समिशनशी जुळत नव्हते. त्यानंतर या मुलींचे डीएनए प्रोफाइलिंग (DNA profile) करण्यात आले. त्यानंतर महिलेचा पती हा त्या मुलींचा बायोलॉजिकल बाप नाही, हे लक्षात आले. हा कुटुंबासाठी मोठा धक्का होता. नवरा बायको एकमेकांवर संशय घेऊन आरोप प्रत्यारोप करू लागले. कुटुंबात तणाव निर्माण झाला.
सातत्याने दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. त्यानंतर दोघांनीही सामंजस्याने घेत रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा आरोप केला. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आपल्यावर ही वेळ आल्याचा दावा करत या दाम्पत्याने नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनमध्ये (NCDRC) धाव घेतली. तसेच नुकसान भरपाई म्हणून आपल्याला दोन कोटी रुपये देण्यात यावे, अशीही मागणी केली. त्यावर सुनावणी करताना कमिशनने रुग्णालयातील डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला आह आणि रुग्णालयाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, त्यामुळे रुग्णालयाने या दाम्पत्याला दीड कोटीची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले.
रुग्णालयांच्या मान्यतेवर प्रश्न
महिलेच्या गर्भधारण प्रक्रियेसाठी तिच्या पतीच्या स्पर्मच्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या स्पर्मचा वापर करण्यात आल्यामुळे नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनने (National Consumer Disputes Redressal Commission) कडक ताशेरे ओढले आहेत. अशा रुग्णालयांची मान्यता तपासली जावी, असे त्यांनी म्हटले आहे.