मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे एक जन्म प्रमाणपत्र मलिक यांनी ट्विटरद्वारे पोस्ट केले आहे. येथूनच बनावट कारनाम्यांना (यहाँ से शुरू हुआ फर्जीवाडा) असे म्हणत त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. समीर वानखेडे यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातून उत्तीर्ण झालेले वानखेडे यांनी आयोगाला कोणते प्रमाणपत्र सादर केले आहे, आयोगाला हे प्रमाणपत्र सादर करुन त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
क्रूझ ड्रग प्रकरणाची चौकशी सध्या वानखेडे करीत आहेत. या प्रकरणी दिवसेंदिवस विविध गौप्यस्फोट आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन हा सध्या कोठडीत आहे. याच प्रकरणात शाहरुखकडे तब्बल २५ कोटी रुपयांची मागणी झाल्याचा खुलासाही झाला आहे. दिवसेंदिवस या प्रकरणात नवनवीन नाट्य घडत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1452486934073278467