मुंबई, ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) परदेशातून हवाईमार्गे किंवा जलमार्गे मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी, परकीय चलन आणि अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यात वाढले असून या प्रकरणी अनेक ठिकाणी विशेष पोलीस पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. परदेशातून येणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीवर पायबंद घालण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारने कडक धोरण अवलंबले आहे.
अंमली पदार्थांविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (NCB) कारवाई सुरू आहे. या ब्युरोच्या पथकाने सुमारे ४ किलो इफेड्रिन जप्त केले. एनसीबीने मुंबईतील धारावी भागामध्ये ही कारवाई केली आहे.विशेष म्हणजे हे ड्रग्ज महिलांच्या कपड्यांमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एनसीबीच्या मुंबई युनिटने अंधेरी (पूर्व) येथे छापा टाकून अमली पदार्थांची हे बॉक्स जप्त केले. ही ड्रग्जपेटी पुण्यातून आल्याचे सांगण्यात येत आहे. या छाप्यात किमान ३ किलो ९५० ग्राम इफेड्रिन जप्त करण्यात आले आहे. माफीयांनी ड्रग्जची ही पेटी सागरी जहाजातून ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
यापूर्वी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एनसीबीच्या पथकाने या महिन्याच्या सुरुवातीला गोव्यात ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यात दोन महिला ड्रग्ज पुरवठादारांना अटक करण्यात आली आहे. पथकाने यातील दोन महिला औषध पुरवठादारांकडून १ किलो गांजा, ४९ ड्रग गोळ्या, २ ग्रॅम कोकेन, १ ग्रॅम एमडीएमए पावडर जप्त केली होती. तसेच मुंबईतील प्रसिद्ध क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दावा केला होता की, एका आरोपी महिलेने सॅनिटरी नॅपकिनमध्ये ड्रग्ज लपवून जहाजात नेले होते. कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील कथित ड्रग्ज पार्टीचा एनसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला. दि. २ ऑक्टोबर रोजी हे जहाज समुद्राच्या मध्यभागी येऊन गोव्याला जात होते.