मुंबई – कोरोनाचा सर्वाधिक फायदा कुणी घेतला असेल तर नक्षलवाद्यांनी. या काळाक गरिबीचे प्रमाण वाढले, बेरोजगारी वाढली. त्यामुळे नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांना ट्रॅप करण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. या काळात नक्षलवाद्यांनी बालकांचे ब्रेन वॉश करण्यावर विशेष भर दिला. अजूनही ही मोहीम नक्षलवाद्यांतर्फे राबविली जात आहे. मुलांना शाळेच्या नावावर प्रशिक्षण केंद्रांमध्ये ठेवून हे काम केले जात आहे.
नक्षलवादी शाळांच्या नावावर नक्षलग्रस्त भागांमध्ये बाल प्रशिक्षण केंद्र चालवितात. लहान मुलांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था या शाळांमध्ये केली जाते. इथे सर्वसामान्य अभ्यासक्रमासह नक्षल विचारांचे धडे मुलांना दिले जात आहे. या मुलांमध्ये आतापासून व्यवस्थेविषयी संताप निर्माण करून त्यांना नक्षल मोहिमेत ओढण्याचा प्रकार सुरू आहे. बस्तर आणि दंतेवाडा येथील अनेक भागांमध्ये सरकारी शाळांची तोडफोड केलेली आहे. याठिकाणी सरकारने पोर्टाकॅबीन शाळांची स्थापना केली होती. मात्र कोरोना काळात शाळा बंद झाल्यामुळे नक्षलवाद्यांनी मुलांना आपल्या शाळांमध्ये येण्याची बळजबरी केली. सद्यस्थितीत छत्तीसगड सरकारने सरकारी शाळा सुरू केल्या आहेत, मात्र अद्याप पोर्टाकॅबीन शाळांना कुलूपच आहे. कारण ही योजना केंद्र सरकारच्या अख्त्यारित येते.
पालकांना धमक्या
नक्षलवादी या शाळांमध्ये मुलांना बॉम्ब बनविण्याचे, शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देत आहे. पालकांना कळल्यावर त्यांनी आक्षेप घेतला व मुलांना पाठविणे बंद केले. त्यामुळे पालकांना धमकावून मुलांना शाळेत पाठविण्यासाठी हतबल केले जात आहे. सुरक्षा यंत्रणा ग्रामवासीयांची भिती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे.