मुंबई – आर्यन खान आणि समीर वानखेडे प्रकरणात दिवसेंदिवस आरोप प्रत्यारोप आणि गौप्यस्फोटांची मालिका सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्विट करीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. लवकरच मी ‘स्पेशल २६’ उघड करणार आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे. त्यामुळे हे स्पेशल २६ काय आहे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वानखेडे यांच्यावर यापूर्वीच अनेक आरोप आणि गौप्यस्फोट मलिक यांनी केले आहेत. हे प्रकरण आता देशपातळीवर गाजले आहे.
मलिक यांनी वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विट केला. त्यात वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत, असे मलिक यांनी म्हटले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वानखेडे यांनी नक्की कोणते जन्म प्रमाणपत्र सादर केले आहे, त्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन फसवणूक केली आहे का, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
वानखेडे हे काल अचानक दिल्लीला गेले होते. तसेच, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने वानखेडे प्रकरणाची दक्षता समितीच्या वतीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. हे पथक आज मुंबईत येणार असल्याचे सांगितले जात आहे. आर्यन खानची सुटका करण्यासाठी अभिनेता शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्याची बाबही दोन दिवसांपूर्वी उघड झाल्याने हे सारेच प्रकरण खुप तापले आहे. आता मलिक हे ‘स्पेशल २६’ उघड करणार असल्याने सगळ्यांचे लक्ष त्याकडे लागले आहे.
Good Morning everyone,
I am releasing soon…
'SPECIAL 26'— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021
पेहचान कौन? नवाब मलिक, राऊत यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडही रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे सातत्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात विविध आरोप करीत आहेत. त्यांच्या गौप्यस्फोटांमुळे आता देशभरात क्रूझ ड्रग पार्टी आणि वानखेडे यांची चर्चा होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही उडी घेतली आहे. आव्हाड यांनी आज सकाळीच एक फोटो ट्विट केला आहे. त्यात म्हटले आहे की पेहचान कौन एक व्यक्ती मुस्लीम मुलांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. आव्हाड यांनी स्पष्टपणे उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख हा वानखेडे यांच्याकडेच आहे. त्यामुळे आता या प्रकरणी आणखीनच चर्चा सुरू झाली आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1452856485319479301