मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सकाळीही पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक म्हणाले, बघा, मी सांगितले होते ना, परिस्थिती ३ आठवड्यातच बदलली आहे. आर्यन खानला जो तुरुंगात घेऊन जात होता तोच आता तुरुंगात जाण्याच्या मार्गावर आहे. आजवर जो आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न करीत होता, तोच आता स्वतःला अटक होऊ नये म्हणूम झटापट करीत आहे. पोलिसांनी सुरू केलेली चौकशी सीबीआय किंवा एनसीबीकडे द्या, अशी आर्जव आता तो करीत आहे. पूर्ण सिक्वेन्स आणि परिस्थिती बदलली आहे. पिक्चर अभी बाकी है, असे म्हणत मलिक यांनी वानखेडे यांच्यावर जोरदार आसूड ओढले.
मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत वानखेडेंबरोबरच भाजपलाही चांगलेच लक्ष्य केले. मलिक म्हणाले की, मी भंगारवाला आहे. माझी औकात १०० कोटींची नाही. मी बँकांचे पैसेही लुटलेले नाहीत की कधी चेकही बाऊन्स केलेल नाहीत. माझ्या घरी कधी सीबीआय किंवा कुणा तपास यंत्रणेची रेडही पडलेली नाही. मी वयाच्या १६व्या वर्षापासून मी भंगारचा धंदा करीत आहे. त्यात काहीही गैर नाही आणि मला त्याचा अभिमानच आहे. माझे आजही भंगाराचे गोडाऊन आहे. माझ्या आजोबांनी किंवा वडिलांनी कुणा डाकू किंवा चोराकडून सोने घतलेले नाही की मी सोन्याची तस्करीही करीत नाही. जी वस्तू उपयोगा नाही ती घेतो आणि तिचे तुकडे करुन पाणी करतो, हाच माझा व्यवसाय आहे, असे मलिक यांनी ठासून सांगितले.
वानखेडेच्या पिक्चरचा शेवट म्हणजे जेव्हा त्याची नोकरी जाईल तोच असेल असा दावा मलिक यांनी केला आहे. वानखेडे प्रकरणावर मी आगामी हिवाळी अधिवेशन गाजवणार आहे. अनेक पुरावे मी सभागृहात सादर करेल. यात भाजपसह अनेकांचं पितळ उघडं पडेल, हे अधिवेशन वादळी ठरेल, असे मलिक यांनी स्पष्ट केले. बघा, मलिक यांची संपूर्ण पत्रकार परिषद
https://www.facebook.com/watch/?v=846746912674900