मुंबई – किंग खान म्हणजेच बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात केवळ चित्रपटसृष्टीतील नव्हे तर सामाजिक आणि राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून त्यातच अनेक जण आरोप-प्रत्यारोप करीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणात पोलिस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर वारंवार वेगवेगळे आरोप केले. यासंदर्भात नवाब मलिक काही दिवस तर रोजच पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना माहिती पुरवत होते. मात्र, आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असून आपल्या घराची रेकी केली जात आहे. भामट्यांनी माझ्या नातवालाही सोडलेले नाही. त्याच्या शाळेपर्यंत पाळत ठेवली जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार व पुरावे देणार असून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नवाब मलिक यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून मी काही प्रकरण उघड केली आहेत. तेव्हापासून माझ्यावर काही जण पाळत ठेवत आहेत. माझ्यावरच नाही तर माझ्या नातवाच्या शाळेपर्यंत हे कथित संशयित पोहोचले आहेत. या हेरगिरी करणाऱ्यांची सर्व माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरोधात मी लवकरच पोलिसात तक्रार दाखल करणार आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
मलिक पुढे म्हणाले की, कदाचित काही पक्षाचे कार्यकर्ते किंवा अन्य व्यक्ती आमच्या घराची आणि ऑफिसची माहिती काढत आहेत. घरातील लहान मुले असून माझे नातू कोणत्या शाळेत शिकतात. त्याचा शोध घेतला जात आहेत. मागच्या आठवड्यात मी दुबईत असताना दोन जण कॅमेरा घेऊन माझ्या घराच्या बाहेर फोटो काढत होते. फोटो काढत असताना त्यांना परिसरातील नागरिकांनी अडवले, त्यामुळे हे संशयित पळून गेले. मात्र त्यांना टिळक टर्मिनसला अडवले होते, मात्र पकडल्या जाऊ म्हणून घाबरून पळाल्याचे त्यांनी सांगितले.
मी ट्विटर आणि फेसबुकवर या लोकांचे फोटो टाकले. त्यातील एका व्यक्तीची माहिती मिळाली आहे. दोन महिने वेगळी प्रकरणे घडत होती, त्यावेळी ही व्यक्ती माझ्याविरोधात सातत्याने ट्विट करत होता. यातील गाडीमालकाचेही नाव समोर आले आहे. मी जे काही बोलत आहे, त्यावरून त्याचा काही प्रकरणातील व्यक्तींशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. मी कागदपत्रे घ्यायला जातो किंवा तक्रार करायला जातो, तेव्हा या व्यक्ती माझ्यावर पाळत ठेवतात, त्यामुळे या प्रकरणी मी पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे. तसेच पोलीस आयुक्तांना भेटून त्याची माहिती देणार आहे, असेही मलीक यांनी सांगितले.