मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज पहाटे चार वाजता सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर धडक दिली. भल्या पहाटे ही कारवाई झाल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. या पथकाने आज सकाळी नवाब मलिक यांना ताब्यात घेतले असून हे पथक मलिक यांना घेऊन ईडी कार्यालयात गेले आहे. मलिक यांची कसून चौकशी सुरू आहे. ईडीच्या पथकाच्या गाडीतच मलिक यांना नेण्यात आले आहे. मलिक यांच्याबरोबर त्यांचा मुलगा आणि वकील अमीर मलिक हा सुद्धा ईडी कार्यालयात दाखल झाल्याचे मलिक यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
https://twitter.com/OfficeofNM/status/1496343770086146048?s=20&t=1dlbH85q9Qmu_Yt_B5OMiw
नवाब मलिक यांची नक्की कुठल्या प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सुडाच्या राजकारणापोटी ही कारवाई होत असल्याचे मलिक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मलिक यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मलिक यांचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर जमणार असल्याचे बोलले जात आहे. एका मालमत्तेच्या गैरव्यवहारावरुन ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1496347887411896321?s=20&t=1dlbH85q9Qmu_Yt_B5OMiw